स्पर्श

स्पर्श       
देवाने स्त्रीला एक संवेदनक्षम मन तर दिले आहे त्याचबरोबर स्पर्शाची भाषा कळण्याचा एक अनोखा मंत्र पण दिला आहे. परवा दुपारी घरी एकटीच होते तेव्हा टीव्हीला मुन्नाभाई एमबीबीएस हा सिनेमा पहात होते. त्यात नायकाची प्रेयसी जी डॉक्टर असते तिच्या तरुण पेशंटला जेव्हा सांगते की तुला पोटाचा कॅन्सर झाला आहे तेव्हा तो दुःखाने आणि उद्वेगाने चिडून तेथून निघून जातो हे पाहिल्यावर नायक तिला म्हणतो तू त्याला जादूची झप्पी द्यायला हवी होती ना! त्याला बरे वाटले असते जादूची झप्पी म्हणजे त्याला जवळ घेऊन मिठी मारायची आणि स्पर्शातून सांगायचं की मी तुझ्या दुःखात सहभागी आहे. स्पर्शात फार मोठी ताकद असते हे पाहिल्यावर मला भरून आले. मला आठवते मी दहा-बारा वर्षाची असेल आमची परिस्थिती सुखवस्तू होती आईचे एक चुलत बंधू होते त्यांची परिस्थिती बेताची होती आईवर त्यांची फार माया होती. त्यांचे ते सारवलेले घर अंगणातील पेरू सिताफळ डाळिंबाची झाडे पिंजऱ्यातील पोपट, विहीर यांचे आम्हाला फार आकर्षण होते आई बरोबर आम्ही त्यांच्याकडे जात असू. असेच एकदा गेल्यावर आई मामा मामीच्या गप्पा झाल्या खाणे पिणे आणि आमचे खेळणे झाल्यावर निघतांना मामींनी मला जवळ घेऊन मायेने माझ्या गालावरून हात फिरवला त्यांच्या हाताचा तो खरबरीत स्पर्श मला अजून आठवतो व त्या अजाण वयात देखील माझ्या घशात हुंदका दाटून आलेला स्पष्ट आठवतो. तो कष्टाने विहिरीवरील पाणी भरून, घरातील सडा सारवण करून खरखरीत झालेल्या हाताच्या 
स्पर्शात देखील मायेचा ओलावा होता की आज 45 वर्षानंतर देखील मी अजून विसरू शकले नाही.
त्यानंतर तरुणपणात बस मध्ये रस्त्यात सहेतुक झालेले नकोसे अनेक स्पर्श असतात की ज्यांना आपण विसरण्याचा प्रयत्न करत असतो. पहिल्यांदा प्रसववेदना सहन करताना रात्रभर जवळ बसून आईने फिरवलेला पाठीवरील हातांचा स्पर्श त्याला तर तुलनाच नाही. त्या स्पर्शाने वेदना सहन करण्याची प्रचंड ताकद मिळाली असते. नवजात बाळाचा स्पर्श, पतीचा आश्‍वासक स्पर्श याला तर आपल्या भावविश्वात खास असे स्थान असते. माझ्या सतरा अठरा वर्षाच्या मुलीचे टॉन्सिल्स चे ऑपरेशन झाले होते ती अर्धवट गुंगीत होती पण तरीही माझा हात तिने घट्ट धरुन ठेवला होता जणू मी तिला सोडून जाणार होते कदाचित त्या स्पर्शांनी तिला वेदना सहन करण्याची ताकद मिळत असेल
पहिल्या नातीच्या जन्माच्या वेळी मी मुली जवळ नव्हते ती सासरी होती. नंतर तिच्याशी बोलताना अपराधी भावनेने मला दाटून आले होते. तिच्या एवढ्या कठीण प्रसंगी मी तिच्याजवळ नव्हते माझ्या स्पर्शाने कदाचित मी तिचे दुःख अंशतः कमी करू शकले असते. अशीही स्पर्शाची अनोखी भाषा आहे. जी समजणे आणि अनुभवणे हे देवाचे वरदान आहे. त्यानंतर परवाच मुलगी नातीला म्हणाली दिया नानीला पापी दे तो साईचा साखर पापा म्हणजे अंगावर मोरपीस फिरल्याचा भास , जणू रेशीम स्पर्श! 
त्या स्पर्शा पुढे बाकी सारे शून्य! असे हे आनंद आणि दुःखाच्या वेळेस झालेले स्पर्श म्हणजे जीवन जगण्याची संजीवनीच ठरतात

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अरुणा

ऋणानुबंध