ऋणानुबंध

ऋणानुबंध
अम्मा
मी लग्न होऊन 47 वर्षापूर्वी तमिळनाडूतील त्रिचनापल्ली किंवा त्रिची या गावी गेले तेथे भेल च्या टाऊनशिप मध्ये सात वर्षे राहून आमची बदली बडोद्याला झाली पण योगायोगाने सोळा वर्षांपूर्वी पुन्हा त्रिचितच माझ्या यजमानांनी दुसऱ्या कंपनीचा जॉब घेतला आणि आम्ही तीस वर्षांनी त्याच गावी राहावयास आलो पण आता टाऊनशिप मध्ये न राहता गावात भर वस्तीत मोठा बंगला भाड्याने घेतला सुंदर जुनी वास्तू समोर पोर्च मागेपुढे विस्तीर्ण अंगण त्यात नारळ केळी आंब्याची झाडे शिवाय फुलझाडे पण होती मोठमोठ्या खोल्या मोठा हॉल प्रशस्त किचन असे ते घर होते माझ्या दोन्ही लग्न झालेल्या मुली आणि मुलगा जो मद्रास मध्ये राहून सीए करत होता त्यांना ते घर फारच आवडले मुलाने तर त्याला मालगुडी डेज मधले घर अशी उपमा दिली तो दर पंधरा दिवसांनी येत असे
अम्माही आम्हाला त्या घराबरोबर मिळालेली कामवाली होती घरमालकानेच आम्हाला ती मिळवून दिली काळी सावळी अंगाने सुदृढ आणि गोलू मोलू अशी अम्मा मद्रासी पद्धतीचे मंगळसूत्र आणि कानात आणि नाकात खड्याचे दागिने घालून हसऱ्या चेहऱ्याने सकाळी साडेसहाला हजर होई तिचे नाव वसुमती होते पण मी तिला अम्मा म्हणे ती पन्नाशीची म्हणजे माझ्याच वयाची होती लहान असेल पाच एक वर्षाने. सकाळी आल्याबरोबर दोन्ही अंगणात सडा रांगोळी काढूनच घरात येई घराची स्वच्छता कपडे भांडे शिवाय मला स्वयंपाक घरात लागेल ती मदत करून ती तिच्या अंगणवाडीतील सेविकेच्या कामाला जात असे शिवाय संध्याकाळी येऊन पुन्हा मला मदत करी चेहऱ्यावर कायम प्रसन्न हास्य मदतीला तत्पर आमच्यात आणखीन एक गंमत होती मला तमिळ भाषेतील शब्द माहीत होते पण वाक्य बोलता येत नसतं तिला तर हिंदी मराठीचा गंधही नव्हता पण आम्ही आठ-दहा दिवसातच एकमेकांशी छान संवाद साधू लागलो बॉडी लँग्वेज आणि चेहऱ्यावरील हावभाव यावरून आम्ही आमची एक नवीन भाषा बोलू लागलो ती तिच्या दिवसभरातील घडामोडी मला सांगे तिच्या तिन्ही मुली शिकत होत्या मोठी तर बीएससी करत होती ती त्यांना शिकवून नोकरी करायला लावणार होती तिच्यासारखे घरकाम त्यांच्याकडून करणे तिला अपेक्षित नव्हते नवरा मजुरी करायचा पण घरात चांगले वातावरण होते तिने कष्टाने आपला संसार उभारला होता
पुढील तीन वर्षात आम्ही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी झालो अतिशय कष्टाळू प्रेमळ हिम्मतबाज अशी अम्मा म्हणजे मला मिळालेले परक्या जागेचे वरदानच होते तीन वर्षात तिने एकही सुट्टी घेतली नाही हे मी कोणाला सांगितले तर नवलच वाटायचे पण सत्य परिस्थिती होती मी नागपूरला आले की यांचा जेवण नाश्ता ती काळजीने आणि मायेने करत असे यांच्या वेळा सांभाळून यांना आवडतं म्हणून नॉनव्हेज बनवून ठेवी घरची केळी आली म्हणून तिने चार-पाच डझन कच्च्या केळ्यांचे मला चिप्स बनवून दिले मुरकु इडीअप्पम नारळाची बर्फी असे अनेक साउथ इंडियन पदार्थ मला करून देत असे सुट्टीच्या दिवशी येऊन मला मदत करी माझ्या मुलीच्या बाळंतपणानंतर बाळाची आंघोळ कपडे धुणे मालिश हे पण तिने आनंदाने केले कधी अवास्तव मागणी नाही किंवा अन्नात लक्ष नाही पण मी केलेला प्रत्येक महाराष्ट्रीयन पदार्थ ती शिकून घेई घरी जाऊन मुलींना खाऊ घाले माझ्या स्वयंपाकाची नेहमी तारीफ करत असेल मी तिला दिल्याशिवाय कधीही नाश्ता करायची नाही याचे तिला फार अप्रूप वाटे
मी तिला सुट्टीच्या दिवशी मंदिरामध्ये गाडीतून घेऊन जाई तंजावर श्रीरंगम समयपुरम अशा अनेक ठिकाणी तिला नेले त्याचे तिला फार कौतुक वाटे तीन वर्षानंतर तेथून निघायची वेळ आली माझा जीव तिच्यात अडकला होता तिने तर रडून रडून मला निरोप दिला मी माझा तात्पुरता संसार आणि भांडी जी तिथे घेतली होती सगळे तिला देऊन आली त्यावर सोळा वर्षे झाले तिची कायमच आठवण येत असेल तिचा फोन नंबर सुद्धा गेला अचानक या नोव्हेंबर महिन्यात यांच्या असिस्टंट च्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण आले माझ्या मनात याचाच विचार आला की माझी अम्माशी भेट होईल यांनी खटपट करून तिचा नवीन नंबर मिळवला आणि तिला तमिळ मध्ये बोलून सांगितले की आम्ही तिच्या घराजवळील हॉटेलमध्ये उतरणार आहे दोघे येत आहोत ऐकून तिला अतिशय आनंद झाला
आम्ही ज्या दिवशी पोहोचलो दोन तासानेच तिचा फोन आला ती खाली आलेली होती तिला वर येण्यास सांगितले दार उघडल्याबरोबर मला मिठी मारून रडू लागली तिच्यात बराच बदल झाला होता मलाही रडू आले काही नाती या शब्दापलीकडचे असतात पुन्हा आमचा तसा संवाद सुरू झाला यांची छान करमणूक झाली त्यांना तमिळ नीट बोलता येते त्यामुळे हे मध्ये मध्ये बोलत होते तिचं रिटायरमेंट झालं होतं पेन्शन सुरू झाली दोन मुलींची लग्न होऊन नातवंडा झाली होती दोघीही नोकऱ्या करत होत्या तिसरी मुलगी नोकरीला लागली होती लग्नासाठी प्रयत्न करते आहे तिचे कष्ट कमी झालेत पेन्शन मिळते आणि एका डॉक्टर कडे स्वयंपाक करते औषध पाण्याची पण सोय आहे मुली नाही म्हणतात पण कष्ट करायची सवय आहे त्यामुळे काम करते एकंदरीत तिच्याकडे पाहून समाधान वाटले दुसऱ्या दिवशी येण्याचे कबूल करून गेली
दुपारी बारा वाजता बेल वाजली दार उघडले तर दोन्ही हातात भरलेल्या पिशव्या केळीचे पान घेऊन अम्मा उभी हसत मुखाने. टेबलवर केळीचे पान मांडून त्यावर वाफेची इडली सांभार मला आवडतो म्हणून चिंचेचा भात वडा पुरी भाजी तर यांना तीन चार प्रकारचे नॉनव्हेज डिशेस पुलाव पराठा असे भरगच्च पान मांडले घरातील होती नव्हते ते सगळे डबे घेऊन आली होती मला तर काय बोलावे सुचेना स्वतः खाली बसली गालावर हात ठेवून आमच्याकडे पाहत होती म्हणाली तुम्हा दोघांना असे जेवताना पाहून खूप संतोष झाला तुमचा फोन आला तर मी दोन दिवस झोपले नाही मला फार आनंद होत आहे हे ऐकल्यावर मला माझ्या आईची फार आठवण झाली अम्माच्या रूपाने माझी गेलेली आईच माझ्यासाठी प्रेमाने जेवण करून घेऊन आली याची मला प्रचिती आली आज कालच्या धकाधकीच्या जीवनात कोण इतक्या प्रेमाने कोणासाठी असे करते आम्ही आनंदाने जेवलो मी तिच्यासाठी नेलेल्या भेटी तिला दिल्या तिचा पत्ता आणि फोन नंबर स्टोअर करून घेतला काळजी घे म्हणून तिचा निरोप घेतला जातानाही मिठी मारून अश्रु पूर्ण डोळ्यांनी गेली मला हा अनुभव लिहावा असे बरेच दिवसापासून वाटत होते मधुराकडे बराच वेळ निवांत मिळाला म्हणून हे शब्दबद्ध केले
स्मिता 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अरुणा

स्पर्श