प्रिय आईस ,


 पहाटेचे चार वाजलेत जाग आल्यावर आधी तुझी आठवण झाली. आज पंधरा ऑगस्ट, तुझा वाढदिवस. तुझी देखणी मूर्ती डोळ्यासमोरून हलत नाही. आज दोन वर्ष झालीत, तू आमच्यातून निघून गेलीस; पण ठाकूरांची शपथ माझा एकही दिवस तुझ्या आठवणीशिवाय गेला नाही. तु माझ्या आयुष्याचा फार मोठा भाग होतीस. तू आहेस या एका आधाराने माझे सगळे जीवन सोपे होऊन गेले. माझ्या प्रत्येक आनंदाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी तू पहाडासारखी माझ्यामागे उभी होतीस. सगळे म्हणतात मला मोठी आई दिसली, मला वाटायचे आपण तर आई बरोबर सगळ्यात जास्त राहिलो, आपल्याला का दिसत नाही, पण मागच्या आठवड्यात तू मला दिसलीस. माझ्याजवळ येऊन प्रसन्न हास्य करीत आपला हात पुढे केलास. मी तुझा हात हातात घेतला तर त्याचा जिवंत स्पर्श मी कधीही विसरू शकणार नाही. जागे झाले आणि तू माझ्या जवळच आहे, हे मला पुन्हा प्रत्ययास आले. आई मी दिवसेंदिवस तुझ्यासारखी होत आहे, हे मला प्रकर्षाने जाणवते. तुला जे जे आवडायचे, तेच मला आवडायला लागले आहे. मग ती एखादी गोष्ट असो किंवा पदार्थ असो किंवा पूजा असो ती देखणी करायची ही तुझी सवय माझ्यात येऊ लागली आहे. ती आम्हा भावंडांना दिलेली तुझी देणगीच आहे. मी कृष्णजन्म तुझ्यासारखा साजरा केला. तुझी ठाकूरांच्या बद्दलची ओढ, ती तीव्रता आम्हा सगळ्यांमध्ये आहे, पण सीमा मध्ये जास्त आली आहे. मधुरा रोज तिचे वाचन आवडीने ऐकते. तुला आनंद होईल मी रोज वचनामृत वाचते. आश्रमाची प्रार्थना नेमाने न चुकता ऐकते. तुझी लाल डायरी रोज मी हातात घेते, तेव्हा त्याला तुझा स्पर्श झालाय ही भावना मला खूप आनंद देऊन जाते. राधा केतकी दिया यांच्या परीक्षेतील यशाने तू किती आनंदित झाली असती या विचाराने आम्ही सगळे खुश होतो. आताच्या लॉक डाऊन मध्ये आई किती कंटाळली असती हे पण मनात येते. दोन दिवस मी तुला भेटले नाही तर मला किती रागवायची हे आठवले की वाईट वाटते. रोज रात्री पाठ टेकताना अजाणता आई ग ही हाक माझ्या ओठावर येते आणि तुझ्या आठवणीने डोळ्यात पाणी येते पण तू आहेस तू तुझ्या स्मृति रूपाने आम्हा सर्वांमध्ये सामावली आहेस या दृढ विश्वासाने मी गाढ झोपी जाते. मला पाहिल्यावर दर एक-दोन दिवसा आड दार उघडल्यावर येणारा तुझ्या चेहऱ्यावरील आनंद आठवला की, माझा दिवस छान जातो. आम्ही सगळे तुझ्या आठवणीचा अमूल्य ठेवा जपतो आहे.

 तुझी स्मिता

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अरुणा

स्पर्श

ऋणानुबंध