नीमा



 उंच गोऱ्या कपाळावर मोठे लाल कुंकू लावलेली व्यवस्थित साडी नेसलेली सुंदर अशी निमा जोशी मला पहिल्याच भेटीत आवडली. मृदू आवाजात ती बोलत होती. यांच्या ऑफिसमध्ये श्रीयुत जयंत जोशी हे जबलपूर हून बदलून आले होते.  त्यांनी आमच्या घराजवळ घर घेतले होते. आम्ही त्यांना भेटायला घरी गेलो होतो या भेटीत निमाला मी हॉबी क्लासेस घेते असे कळले आणि ती ड्रेस डिझायनिंग शिकायला माझ्याकडे येऊ लागली.  कमी बोलणारी पण कामात अतिशय व्यवस्थित होती ती उत्तम शिवण करत असे. गंमत म्हणजे ती सायकल ने मुलांना शाळेत सोडून मग माझ्याकडे येत असे.  मला तर खूपच आश्चर्य आणि कौतुक पण वाटत असे ती धीट आणि स्पष्टवक्ती पण होती.  हळूहळू आम्ही एकमेकींना समजून घेऊ लागलो.  आमच्यात मैत्रीचे नाते निर्माण होऊ लागले.  एकमेकींकडे जाऊन गप्पा करू लागलो.  तिने ऑफिसचा लेडीज क्लब देखील जॉईन केला पण तेथेही ती ऑफिसच्या गाडीने न येता आपली आपण टू व्हीलर घेऊन येत असे आणि सगळ्यात मागे शांतपणे बसलेली असे.  कधीकधी ती शिष्ट असल्याचा गैरसमज पण लोकांचा होत असे, पण हळूहळू ती आमच्या मराठी ग्रुप मध्ये सामील झाली. आज आमच्या मैत्रीला तीस बत्तीस वर्ष झाली . निमा बद्दल मी काय लिहू.  इतक्या वर्षाच्या सहवासानंतर निमा ही उत्तम गृहिणी,  उत्तम विद्यार्थी,  उत्तम शिक्षक,  उत्तम लेखिका आणि वक्ता, उत्कृष्ट विणकाम, भरत काम अशी सर्वगुणसंपन्न व्यक्ती आहे.  हे मी अनुभवले आहे. ती या सर्वच गोष्टीत प्रवीण आहे.  मला तिच्या भरत कामाचे फारच कौतुक आहे. इतक्या सफाईने आणि स्पीडने मोठमोठ्या चादरी साड्या ओढण्या विणते की आपण चकित होऊन जातो. अगदी पेंटिंग वाटावे इतके सुंदर भरत काम ती करते.  स्वेटर सुद्धा छान विणते.  चाळिशीच्या जवळ असताना तिने संस्कृत मध्ये एम ए केले ते पण यूनिवर्सिटी मध्ये अकरा मेडल्स मिळवून ती टॉपर झाली.  तिच्या या यशाबद्दल आम्ही पार्टी पण केली.  त्यानंतर मुलं शिक्षणासाठी आणि नोकरी निमित्त दूर गेल्याने आणि यजमानांना साईट वर जावे लागल्याने,  तिने संस्कृत मध्ये पीएचडी केले.  तिच्या हार्डवर्क ची मी साक्षीदार आहे.  अतिशय मेहनत करून तिने तिचा प्रबंध पूर्ण केला.  मला लिहिलेले वाचायला देत असे. मी तर तिला नेहमीच चिडवायचे, अगं पीएचडीच्या विषयाचे टायटल पण इतके मोठे आणि कठीण आहे.  मध्यंतरी दोन अपघात झाले.  तिला बरेच दिवस आराम करावा लागला. त्यात मुलीच्या लग्नाची तयारी पण होतीच, पण तिने जिद्दीने तिचा पीएचडी चा अभ्यास पूर्ण केला आणि डिग्री मिळवली.  कधीही तिच्या चेहऱ्यावर कंटाळा नाही.  नेहमी प्रसन्न आणि हसतमुख. आमच्या दोघींमध्ये स्नेहाचे एक सुरेख नाते आहे.  एकमेकींचे जवळ आम्ही सुखदुःखाच्या सर्व गोष्टी मनमोकळेपणाने बोलू शकतो. जेव्हाही मी आईकडे जात असे,  निमा चा घराचा दरवाजा उघडा असेल,  तर माझी पावले आधी तिच्याकडे जात. मला पाहिल्यावर आनंदाने ती स्वागत करत असे.  प्रेमाने मला आवडेल त्या वस्तू करून खाऊ घालत असे.  हास्यविनोद करण्यात दोन तास कसे निघून जातात हे आम्हाला कळतही नसे.  माझ्याकडे आल्यावर पण तेच होत असे.  आम्ही दोघी कुठे एक्झिबिशन तर कधी राज्य नाट्य स्पर्धा,  कुठे चांगले लेक्चर असेल किंवा चित्रकला महाविद्यालयातील चित्रप्रदर्शन असू दे, आमची जोडी तेथे पोचलीच समजा.  मधले पंधरा वर्ष आम्ही अशी एकत्र भरपूर मजा केली.  त्यामध्ये आमच्या मुलांचे लग्न, रिसेप्शन्स, नातवंडांचे बारसे इत्यादी पण एन्जॉय केले.  आम्ही एकमेकांचे फॅमिली फ्रेंड झालो.  मी तिच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकले. आम्ही दोघीही एकमेकींच्या प्रेरणास्थान आहोत. माझ्या मुलांना तिने बारावीचे संस्कृत शिकविले दोघांनाही बोर्डात पैकीच्या पैकी मार्क्स मिळालेत.  मुलीला तर भरत काम देखील शिकवले. तिला निमा ऑंटी म्हणजे आदर्श गृहिणी आहे. अशी सुसंस्कृत आणि विद्वान मैत्रीण मला मिळालेली देणगीच आहे. मी, निमा, शोभा आणि हेमा यांचा चांगला ग्रुप झाला आहे.  या दोन-तीन वर्षात आम्ही सगळेच मुलांकडे जात येत असतो,  त्यामुळे भेटी थोड्या कमी झाल्यात पण परत आल्यावर नवीन उत्साहाने पुन्हा भेटतो आणि हे आनंद यात्रा सुरूच राहते. ही मैत्रीची श्रीमंती फार नशिबाने लाभते, ईश्वराने मला ती भरभरून दिली आहे.  खूप प्रेम करणाऱ्या मैत्रिणी मला लाभल्या,  हे मी माझे भाग्य समजते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अरुणा

स्पर्श

ऋणानुबंध