सीमा

सीमा 

आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीविषयी लिहायचे म्हणजे काय लिहावे हा मोठा प्रश्न पडतो. सीमा विषयी लिहायचे म्हणजे तिची विविध रूपे मला दिसू लागली. आई दादांची लाडकी सीमा, शेखर आणि माझी प्रिय बहीण, राजू संजू ची प्रेमळ अक्का, माझ्या मुलींची लाडकी मावशी, विनोद ची प्रिय पत्नी, सासुरवाडी ची कर्तबगार मोठी सून, तर पियू प्राजु आणि सायली ची मैत्रिणी सारखी खंबीर आई. खूप सार्‍या मैत्रिणींची प्रिय सखी आणि आता नातवंडांशी आवडती आऊ, बघता बघता घरातली छोटी सीमा एवढी मोठी कधी झाली हे कळलेच नाही.
लहानपणी लहान म्हणून ती आई दादांची फार लाडकी होती. दादा तिला विचारायचे सीमा ताईचा पहिला नंबर आलाय तुझा कितवा येणार आहे. तर मिश्किलपणे हसून म्हणायची दादा हाताची सगळी बोटे सारखी नसतात ना, सगळे हुशार असले पाहिजे असे नाही ना. दादांनी तिला कॉलेजमध्ये जायला पहिली लुना घेऊन दिली. ती सीमा, दादांच्या अचानक जाण्याने अवघी सतरा वर्षाची असतांना आई शेखर राजू संजू चा आधार झाली. तिने आईला खूप चांगली साथ दिली. सगळ्या घराला चांगले सांभाळून घेतले. संजू राजू वर कडकपणे लक्ष ठेवले, त्यांना वेळोवेळी अभ्यासासाठी रागवत असे. तिने स्वतःसाठी आईबरोबरच चार-पाच वर्ष नवीन कपडा घेतला नाही. मला तिचे फारच कौतुक वाटायचे. मी माहेरी गेले, की मुलींना बिनधास्तपणे तिच्यावर सोपवून आई बरोबर बाहेर जाणे, सगळ्यांशी गप्पा करणे यात मशगुल होत असे. ती त्यांचे खाणे पिणे सगळं सगळं नीट करत असे. मला भेटायला मावश्या, मावस बहिणी येत असत. तेव्हा त्यांचे खाणे पिणे, चहापाणी सगळं सीमा उरकत असे. पुन्हा स्वयंपाक घर स्वच्छ करून ठेवी. आईचा हा गुण तिने बरोबर घेतला आहे. तसे आईच्या बऱ्याच चांगल्या गुणांचा वारसा तिलाच मिळाला आहे. स्वभावाने थोडी तापट आहे, पण चांगल्या गोष्टींसाठी तिला राग येतो. वेळ पडली तर समोरच्याची कान उघडणी ती सहज करते. इतर वेळी मात्र कष्टाळू, मनमिळावू उत्साह मूर्ती आहे. तिच्या या स्वभावाने तिने अनेक माणसे जोडली. बराच मोठा मित्र परिवार आहे. सासू-सासर्‍यांची उत्तम सेवा केली, जावेशी आणि नणंददेशी तिचे बहिणीसारखे नाते आहे. जीवाभावाच्या मैत्रिणी जोडल्या. 
खामगाव सारख्या छोट्या गावात राहून देखील मुलींना उत्तम शिक्षण दिले. स्वतः देखील तेथील महिला मंडळात ती उत्तम कार्यकर्ती आहे. वेळोवेळी कथाकथन, प्रवचन, भजनाचा कार्यक्रम, व्यक्तिचित्रणे इत्यादी अनेक उपक्रम त्या राबवत असतात. अनेक सहली आयोजित करून फिरून येतात आणि स्वतःला अपडेट ठेवत असतात स्वतःच्या मोठ्या घराच्या भोवती तिने सुंदर बाग फुलवली आहे. तिचे घर म्हणजे आई आणि माझ्यासाठी तर माहेरच आहे. आम्हा सगळ्यांनाच तेथे जाणे म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. तिच्या देवघरात बसून पहाटे आम्ही केलेल्या गप्पा म्हणजे आमच्यासाठी खूप मोलाचे क्षण आहेत. आई ची अध्यात्मिक आवड तिच्यात पुरेपूर आहे. मनोभावे ठाकूरांची उपासना करते. घरातील सगळे सणवार उत्तम रित्या साजरे करते. 
आम्हा भावंडांचे एकमेकांशी एक स्पेशल नाते आहे. आई गेल्यानंतर तर आम्ही एकमेकांच्या अधिकच जवळ आहोत. मी आणि सीमा दर दोन दिवसांनी फोन मुळे संपर्कात असतो. आम्ही आपापल्या मुलांमध्ये संसारामध्ये गुंतलेले असूनही एकमेकांची तेवढीच ओढ आहे. ती येथे नसल्याने आम्हा सगळ्यांना तिची नेहमी आठवण येते. विनोदी बोलून सगळ्यांना हसवणे तिला फार छान जमते.
आज तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आमच्या या हसतमुख जगन मित्र असलेल्या छोट्या बहिणीला माझ्याकडून अनेक हार्दिक शुभेच्छा. तिथे पुढील आयुष्य देखील असेच आनंदी आणि आरोग्य संपन्न जावो हीच सदिच्छा.
 हॅपी बर्थडे डियर सीमा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अरुणा

स्पर्श

ऋणानुबंध