स्पर्श
काल फेसबूक वरील एक रील पाहिले. त्यात नायिका जी वेश्या असते तिच्या प्रियकराला, फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवायला आणि थोपटायला सांगते. तो तिला थोपटत असताना, तिच्या चेहऱ्यावरचे भाव इतके बोलके होते, त्यात इतक्या वेदनादायक प्रवासाला स्वीकारून ती इथपर्यंत आली याचे आपल्याला त्यात स्पष्ट दर्शन घडते आणि त्या आश्वासक वासनारहित स्पर्शाने तिच्या तनामनाला जो स्पर्श केलाय त्याचा निखळ आनंद तिच्या चेहऱ्यावर आपल्याला स्पष्ट दिसतो. त्यातच ती आपल्या डोळ्यातून वाहणारे पाणी निग्रहाने थांबवते. हे सर्व त्या एक मिनिटात सिन मध्ये त्या अभिनेत्रीने जिवंत केले.
हे सर्व बघताना माझ्या डोळ्यात पाणी आले. मी विचार करू लागले. खरंच स्पर्शाची जादू फार मोठी आहे. एक वाचलेला प्रसंग आठवला, म्हाताऱ्या आईला भेटायला अनेक वर्षांनी तिची मुलगी आली तिने आईला मिठी मारली तर ती म्हातारी बाई रडू लागली. कारण विचारल्यावर आई म्हणाली किती तरी वर्षात मला कुणी स्पर्श केला नाही त्या मुळे आज खूप भरून आले. खूप आनंद वाटला त्या जर्जर देहाला ती प्रेमपूर्ण मिठी आनंद देऊन गेली. खरेच आहे आज दोन प्रेमाचे शब्द, एक स्नेहपूर्ण स्पर्श फार दुर्मिळ झालाय. आपण सगळेच टीव्ही मोबाईल यामध्ये इतके बिझी झालो प्रत्यक्ष भेट शक्य असूनही फोनवरून एकमेकांना शुभेच्छा देत असतो, मोठमोठे मेसेजेस पाठवतो, पण त्यात प्रत्यक्ष भेटीचा ओलावा नसतो .
एकटी राहिलेली एक आई आम्हाला पार्क मध्ये बसले असताना सांगत होती. मुले कपडे खाणे पिणे औषध यावर भरपूर पैसा खर्च करतात पण प्रेमाने आपुलकीने दोन शब्द बोलायला त्यांच्याजवळ वेळ नाही. डोळ्याच्या डॉक्टर कडून औषध घालून घरी येताना मी एकटी असते त्यावेळेस मनाला ज्या वेदना होतात त्यावर प्रेमाची फुंकर घालायला कोणाजवळ वेळ नाही याचे दुःख सतत ठस ठसत राहते.
मला नेहमी वाटायचे आपण दोघेच एकटे राहतो, मुले दूर असतात पण एकत्र कुटुंबात राहुन देखील मनाने काळजीने एकत्र राहणे दुर्मिळ आहे कोणी प्रेमाने काळजीपोटी बरे नसताना आपली विचारपूस करावी आपला हात हातात घेऊन विचारावे तू ठीक आहेस ना ही छोटीशी इच्छा देखील अपूर्ण राहते. ह्या माझे लहान मोठे माझे लहान मोठे छोट्या छोट्या गोष्टींनी खूप फरक पडतो
मी तर माझ्या साठी नंतर कुठेही लग्नकार्यात माझ्या आत्या किंवा काका यांना भेटले की प्रेमाने मिठी मारते त्यांना म्हणते आता मी नमस्कार करणार नाही माझे लहान-मोठे चुलत मावस भाऊ बहिणी जरी भेटल्या तरी त्यांना मिठीत मारते. सुरुवातीला त्यांना लाजल्यासारखे वाटायचं पण आता हसू येतं आणि आनंदही होतो. मुली तर नेहमीच मिठी मारतात मुलगा दोघी पेक्षा लहान आहे तो भेटल्यावर त्याला मारलेली मिठी खूप आनंद देऊन जाते.. लॉकडाऊन नंतर गावातच असलेल्या लहान भावांना मारलेल्या मिठीत भेटीचा आनंद आणि गोडवा होता
घरातील पाळीव प्राण्यांना देखील स्पर्शाची भाषा कळते मग आपण तर जिवंत हाडामासाची मन भावना असलेली माणसे आहोत.. आयुष्याच्या संध्याकाळी जोडीदाराच्या हातात हात घालून शांतपणे बसणे हे पण एक सुखच आहे मित्र-मैत्रिणींबरोबर बसून आपले सर्व सुख दुःख शेअर करणे म्हणजेच आपण एकमेकांसाठी आहे ही भावना व्यक्त करण्यासारखी आहे
प्रत्येक व्यक्तीने आपल्या वागण्या बोलण्यातून आपल्या स्पर्शातून आपल्या प्रिय व्यक्तीला हे जाणवून दिले पाहिजे की माझे तुझ्यावर प्रेम आहे मी तुझी काळजी करतो तुझ्यासाठी मी कायम असेल .
वयस्कर लोकांना तर जीवनाच्या संध्याकाळी या गोष्टीमुळे खूप मानसिक आधार मिळेल एक आश्वस्त भावना त्यांच्या मनात कायम राहील वेळ थोडा असला तरी हे व्यक्त व्हायला हवे यात कसूर नको नाहीतर मी हे सांगायचे राहूनच गेले असे वाटत राहील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा