दादा - बाळासाहेब पाचपोर

प्रिय दादांना सादर प्रणाम
कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला 
वैभवाने ड वरून आला याल का हो बघण्याला
तीर्थरूप दादांची आठवण झाली की याच ओळी माझ्या ओठावर येतात आज तुमचा स्मरण दिवस!
तुम्ही जाऊन 42 वर्षे होऊन गेलीत तुम्ही अकस्मात पणे आमच्या आयुष्यातून निघून गेलात पण तुम्हाला विसरणे अशक्यच होते. मी तर असे म्हणेन की आई आणि आम्ही भावंडे यांनी तुम्हाला आमच्या मनात आज इतकी वर्ष जिवंत ठेवले, तुमच्या अनेक आनंदी स्मृती आम्ही आमच्या आयुष्यात जाग्या ठेवल्या
अवघ्या 49 वर्षाच्या आयुष्यात तुम्ही आमच्यासाठी आपल्या भावंडांसाठी आणि सर्वपरिचितांसाठी इतके केले की त्याला गणतीच नाही. आजही जुने कोणी भेटले की तुमचे कौतुकच करतात मला आठवते मी माटरगावी आजोळी जायचे तर कप्तान साहेबांची लेक आली आहे असे आदराने आणि प्रेमाने सर्व लोक बोलत आपल्या गावातील मुलगा पोलीस इन्स्पेक्टर झाला याचे सर्वांनाच कौतुक होते
घरच्या आर्थिक अडचणींमुळे तुम्ही मामांकडे आणि आक्का आत्याकडे राहून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले हुशार असूनही पुढचे शिक्षण न घेता सागर येथे पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये भरती झालात आणि नोकरीला लागला.
घरातील मोठा मुलगा असल्याने आईवडिलांची आणि लहान बहिण भावांडांची जबाबदारी आपल्या कोवळ्या खांद्यावर घेऊन पुढील तीस वर्ष अविरतपणे ती पार पाडली. सगळ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण केल्या त्याचबरोबर मुलगा मुलगा उत्तम पती उत्तम पिता, भावंडांचा पहाडासारखा खंबीर भाऊ, नोकरीत सुद्धा प्रामाणिक आणि लोकांची मदत करणारा सज्जन पोलीस ऑफिसर असा लौकिक तुम्ही मिळवला .
माझ्या आठवणीत आईवर निरतिशय प्रेम करणारे आम्हा भावंडांवर माया करणारे सगळ्यांची काळजी घेणारे असेच दादा आहेत तुमची देखणी आणि रुबाबदार मूर्ती कायम माझ्याच मनात आहे तुम्हाला खेळण्याची विशेषतः हॉकी ची फार आवड होती त्यात तुम्ही ट्रॉफीस पण मिळवल्या होत्या तुम्हाला संगीताची पण खूप आवड होती जुनी गाणी आणि जगजीत सिंगचे बरेच रेकॉर्डस आपल्याकडे होती
दिवस रात्र कामाच्या व्यस्ततेने तुम्हाला स्वतःसाठी वेळच मिळाला नाही याचे वाईट वाटते आज तुम्ही असता तर आम्ही तुम्हाला कितीतरी गोष्टी दाखवू शकलो असतो आई आणि तुम्ही एकत्र प्रवास केला असता इतके कष्ट घेतल्यानंतर तुम्हाला देखील चार क्षण निवांत मिळाले असते याची खंत आहे
एकदा रात्री आम्ही जीपने सिनेमा पाहून बारा वाजता परत येत होतो तर तुम्ही गस्त घालण्यासाठी थंडीमध्ये रस्त्यावर उभे होता मला या गोष्टीचे आजही वाईट वाटते आमच्या सुखासाठी तुम्ही घेतलेले कष्ट वाया गेले नाहीत
तुम्ही गेल्यावर आई आणि शेखरने यशस्वीपणे घराची जबाबदारी पार पडली तुमची उणीव शेखरने उत्तमरीत्या भरून काढली आजही तो मायेने सर्वांची काळजी घेतो
आम्हा मुलांसाठी तुम्ही फार हळवे होता माझ्या लग्नात रात्री मी वरातीबरोबर जात असताना माझ्या ट्रेन बरोबर रडत धावणारे तुम्ही मी आज इतके वर्ष झाले तरी विसरू शकत नाही. शेखरच्या भविष्यासाठी त्याला तुम्ही सांगलीला पाठवले सीमा तर तुमची फार लाडकी होती . संजू राजूंचे तुम्ही फार लाड केले आम्हाला तुम्ही फार हवा होता.
संजू राजू फार लहान होते पण तुम्ही गेल्यावर आईने आणि आम्ही त्यांना फार जपले आजही ते आमचे फार लाडके आहे
मी तुमच्याबद्दल पहिल्यांदाच लिहिले पण माझे शब्द अपुरे पडतात तुझ्यासारखे वडील आम्हाला लाभले आम्ही फार भाग्यवान आहोत
स्मिता

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अरुणा

स्पर्श

ऋणानुबंध