राजीव
कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला
वैभवाने बहरून आला याल का हो बघण्याला
हे गाणे जेव्हा मी ऐकते तेव्हा माझ्या दोन प्रिय व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर येतात. एक माझे वडील त्यांना मी दादा म्हणायचे आणि दुसरे म्हणजे माझे पती राजीव अभ्यंकर.
आमचे दोघांचेही वडील पोलीस डिपार्टमेंट ला नोकरीला होते त्यामुळे परिचित होते त्यातूनच योगायोगाने आमचे लग्न ठरले मी फायनल ला असताना झालेसुद्धा, नंतर मी येऊन परीक्षा दिली आणि ग्रॅज्युएट झाले.
आमच्या लग्नाला जवळपास त्रेचाळीस वर्षे झाली मी मागे वळून बघते तर यांची अनेक रूपे मला दिसतात वयाच्या 24व्या वर्षी आम्ही लग्न होऊन तमिळनाडूतील त्रिची येथे गेलो हे मितभाषी होते पण यांनी माझी खूप काळजी घेतली मला आणि मुलींना घेऊन केलेले असंख्य प्रवास आठवतात. अनेकदा कठीण प्रसंग आले पदरी फारसा पैसाही नसायचा तरीही मी कधी यांना घाबरलेले किंवा डगमगले ले पाहिल्याचे मला आठवत नाही नेहमी शांत डोक्याने निर्णय घेऊन त्यावर ठाम राहिले प्रसंगी कधी निर्णय चुकला तरी त्यातून योग्य तो मार्ग काढला कधी कोणाच्या मदतीची अपेक्षा केली नाही स्वतःच्या कर्तबगारीने आम्हाला अत्यंत चांगल्या परिस्थितीत नेहमीच ठेवले..
यांचा स्वभाव शीघ्रकोपी आहे त्याचा मला आणि मुलांना बरेचदा त्रास झाला पण अतिशय शिस्तप्रिय असल्याने आम्हाला चांगले वळण ही लागले. अतिशय हुशार असल्याने शिक्षणात नेहमी प्राविण्य मिळविले. नॅशनल स्कॉलरशिप मिळवून त्यावर आपले शिक्षण पूर्ण केले . स्कॉलरशिप च्या पैशातून होस्टेल आणि शिक्षणाचा खर्च करून उरलेले पैसे ते आईला घरखर्चाला देत आईचे फार लाडके होते दुर्दैवाने आईचा सहवास त्यांना फारसा लाभला नाही याचे मलाही नेहमी वाईट वाटते..
आपली नोकरी अतिशय प्रामाणिक ते नि आणि सचोटीने करून आपल्या क्षेत्रात नाव कमावले अतिशय कष्टाळू स्वभाव आहे एखादी गोष्ट मनावर घेतली तर ती पूर्ण कळणारच. त्यांच्या स्वभावामुळे घरात मला व मुलांना त्यांचा धाक होताच पण आमच्या छोट्या छोट्या सुख सुविधांकडे त्यांचे पूर्ण लक्ष असे. मुलांच्या शिक्षणासाठी आम्हाला फ्लॅट घ्यावा लागला पण मुलींच्या लग्नाची वेळ येताच त्यांनी प्लॉट घेऊन उत्कृष्ट सोयीस्कर असे घर बांधले त्यात अद्ययावत सोयी करून घेतल्या. मुले लहान असतानाच फियाट गाडी घेऊन आम्हाला दरवर्षी वर्षातून दोनदा अनेक राज्यातून फिरवून आणले ड्रायव्हिंग ची अत्यंत हौस होती आजही आहे.
कोकणस्थ असूनही त्यांनी आयुष्यभर कुठेही काटकसर केलेली मी पाहिली नाही मला कपड्यांची फार आवड असल्याने मी नेहमी कपडे खरेदी करत असे त्यालाही कधी आज पर्यंत विरोध केला नाही मला आईने शिवण काम करण्यासाठी मशीन दिले त्याची त्यांनी जन्मभर सर्विसिंग केली त्याला मोटर लावून दिली. आज पर्यंत मला जे जे हवे ते सर्व मला न मागता यांच्याकडून मिळाले
माझ्या इतक्या वर्षाच्या सहजीवनात मी त्यांच्या तोंडून मी थकलो, बोअर झालो किंवा मला टेन्शन आले हे शब्द एकदाही ऐकले नाही ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. मुलांच्या शिक्षणासाठी कधीही पैशाकडे पाहिले नाही. मुलींची लग्ने उत्तम रीतीने केली मुलेही चांगली शिकली आपापले चांगले जोडीदार निवडले आता आम्ही दोघेच असतो आतापर्यंतचे आमचे सहजीवन हे अनेक चढ-उतार पाहून निवृत्तीपर्यंत येऊन पोहोचले आहे. अनेक अनेकदा वाद-विवाद प्रसंगी भांडणे पण झाली प्रसंगी दोघांच्याही सहनशीलतेचा कस लागला त्यांचा तापटपणा माझा हट्टी स्वभाव यामध्ये दोघांनाही त्रास सहन करावा लागला आता दोघांच्याही स्वभावातील कंगोरे बोथट झाले त्यामुळे वाद झाले तरी लगेच दोघेही शांत होतो. दोघेही मुलांजवळ एकमेकांच्या तक्रारी करत असतो पण पुन्हा एक होतो मला वाटतं बहुतांश जोडप्यांमध्ये असेच घडत असेल
जन्मभर नोकरीमुळे घरासाठी वेळ मिळत नसे आता ते घरी असल्यामुळे घरात पूर्णपणे लक्ष देतात काही बिघडलं तत्परतेने त्याची दुरुस्ती होते काही संपलं तर ताबडतोब आणल्या जाते मी तर गमतीने माझ्या मैत्रिणींना सांगत असते की माझ्या घरात एक उत्तम गृहिणी आहे मला काही काळजीचे कारण नाही, ते उत्तम लाडू तयार करतात. शिरा उपमा लोणी कडवणे एवढंच काय मसाल्याची सुपारी सुद्धा उत्तम बनवतात नाती आल्या की त्यांच्यासाठी मटन चिकन बनवणे केक बनवणे ही त्यांचीच कामे आहे त्या बाबतीत मी फार भाग्यवान आहे पुन्हा मी हे केले असा उच्चारही करत नाही. मोठ्या नातीला त्यांनी स्कुटी शिकविली लहान नातीला आनंदाने ऑनलाइन अभ्यास घेतात.
माझ्या माहेरच्यांचा ते कायमच आधार आहेत माझे तिन्ही भाऊ त्यांना फार मान देतात माझ्या आईचे ते लाडके जावई होते तिला त्यांचे फार कौतुक होते प्रत्येक वेळी आम्हा दोघींना ते उत्तमोत्तम साड्या घेऊन येत तिला त्यांनी आई प्रमाणे मान दिला तिची प्रत्येक हौस पूर्ण केली
माझी जवळपास प्रत्येक इच्छा त्यांनी पूर्ण केली प्रवास करताना लहान लहान गावात काही माझ्या आवडीचे दिसले तर थांबवून ते घ्यायला लावतात लॉक डाऊन मुळे घरात बसून कंटाळा आला असल्याने दर आठवड्याला सकाळी पाच वाजता मला न चुकता तासभर फिरवून आणतात माझ्या आवडीची भाजी बिस्किटे आईस्क्रीम न सांगता आठवणीने आणून ठेवतात माझ्या गप्पिष्ट स्वभावामुळे मी अनेकदा मैत्रिणींशी तासन तास फोनवर बोलत असते किंवा पेंटिंग करत असते तेव्हा कधीही न चिडता ते स्वयंपाक घरातील राहिलेली कामे करून टाकतात त्यामुळे मी निश्चिंत असते
आज त्यांचा वाढदिवस आहे खूप दिवसापासून मनात हे सर्व लिहिण्याचे होते पण हे सर्व शब्दात कसे मांडावे हे समजत नव्हते आताही हे पूर्ण झाले असे वाटत नाही म्हणून वरील कवितेच्या ओळी मला अगदी समर्पक वाटतात माझ्या वडिलांनी माझ्यासाठी निवडलेला हा कल्पवृक्ष आहे आणि त्याची सावली माझ्यावर कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी हे मनोगत संपवीत आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा