भागीरथी - आईची मावशी
भागीरथी
हुशंगाबाद येथील मिलमध्ये माझे पणजोबा दिवाण होते त्यांची लहान मुलगी भागीरथी अतिशय चुणचुणीत आणि कुशाग्र बुद्धीची होती. दहा वर्षाची असताना सर्व गृहकृत्यात ती निपुण होती काही ब्रिटिश अधिकारी आजोबांकडे भोजन करण्यास आले होते तेव्हा तिने स्वतः रांधून पंगत बसवून त्यांना भोजन करविले होते त्यांच्या प्रश्नांना हुशारीने उत्तरे दिली होती ते फार अचंबित झाले माझ्या पणजोबांना म्हणाले मला जर मुलगा असता तर मी हिला नक्की सून करून घेतले असते ही आणि अशा अनेक गोष्टी मी लहानपणापासून मावशी विषयी ऐकत मोठे झाले.. भागीरथी 13 14 वर्षाची असताना तिचा विवाह दत्तभक्त अशा तरुणाशी झाला पण लग्नानंतर वर्षभरातच तिचे यजमान संसाराचा
त्याग करून हिमालयात निघून गेलेत. ही पंधरा-सोळा वर्षाची तरुणी आपल्या खाष्ट सासू आणि नणंदे बरोबर राहू लागली वडील आणि भाऊ तिला आणण्यासाठी गेले तर तिने स्पष्ट नकार दिला मी देखील माझ्या पती सारखी दत्त भक्ती करेल असे सांगितले
सासु बाईंना म्हणाली मला गाणगापूरला सोडून या मी तेथे राहून माझ्या पती सारखी दत्त भक्ती करेल सासुबाई तिला घेऊन गाणगापूरला आल्या तेथे धर्म शाळेत मुक्काम केला आज पासून 80 90 वर्षांपूर्वी चे गाणगापूर नुसत्या कल्पनेने ही भीती वाटेल वीज नाही अतिशय छोटे जंगल असलेले हे खेडेगाव होते देवळापासून तीन मैल अंतरावर प्रसिद्ध अशा भीमा अमरजा नद्यांचा संगम आहे ते तेव्हाही जागृत देवस्थान होते. ही मुलगी तेथे राहून देवस्थानात सेवा आणि दत्तभक्ती मनोभावे करू लागली बारा वर्ष तिने नुसते दाणे गुळ खाऊन साधना केली तिला सगळे गावकरी आणि पुजारी आदर आणि मान देऊ लागले मंदिराला लागून असलेली पहिल्या मजल्यावरची खोली मावशीला राहण्यास देण्यात आली. रोजच्या प्रसादातील काही भाग तिला रोज पाठवण्यात येई.
सकाळी संगमावर जाऊन स्नान करून ती लोटांगण घालीत मंदिरापर्यंत येई दिवसभर ध्यान जप करी मधून मधून तिच्या सासूबाई तिच्याजवळ येऊन रहात मुद्दाम घागरीतील पाणी ओतून देऊन पहाटे तीनला तिला संगमावर पाणी आणण्यास पाठवीत ही जीव मुठीत धरून जाई आजूबाजूला झाडी जंगली जनावरांचे देखील भय असते पाणी घेऊन परत येताना मागून खडावांचा आवाज येत असे माई डरना नही हम तुम्हारे साथ है असे कोणीतरी म्हणत होते देवळापाशी आल्यावर तिने मागे वळून पाहिले तर त्रिमुखी दत्त महाराज साक्षात उभे होते त्यांच्यातून अलौकिक असा प्रकाश निघत होता हे मावशीने स्वतः माझ्या आईला सांगितलेलं आहे ही घटना ऐकली की आज देखील अंगावर रोमांच उभे राहतात व डोळ्यात पाणी येत.
भागीरथी बाईंनी परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती यांना आपले गुरु केले होते ते गाणगापुरात नेहमी येत सोबत अनेक गुरुबंधू आणि भगिनी होत्या मावशीने त्यांच्यासोबत अख्या भारतभर सर्व तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे यांची यात्रा केलेली आहे त्यानंतर 25 वर्षानंतर देखील ती प्रत्येक स्टेशनचे नाव ट्रेनची नावे किती वाजता किती गावे प्रवास केला हे अचूक सांगे अतिशय तल्लख स्मरणशक्ती होती तिची. दिसायला गोरीपान ठेंगणी कपाळावर मोठे लाल कुंकू आणि दाट केसांचा अंबाडा अंगावर सुती नऊवार पातळ अशी तिची मूर्ती मला आज देखील स्पष्ट आठवते
आता थोडे भूतकाळाकडे वळू माझी सख्खी आजी ही भागीरथीची मोठी बहीण जी अमरावतीला श्री. बाबरेकर यांना दिली होती तिला चार मुली होत्या माझे आजोबा त्या काळात ब्रिटिशांचे आर्किटेक्ट होते त्यांना ड्राफ्ट्समन म्हणत त्यांच्या हाताखाली ब्रिटिश मुली मदतनीस होत्या अतिशय ऐश्वर्यात त्यांनी आजी बरोबर संसार केला पण अल्पयुष्य ठरल्याने ते अल्पवयातच देवा घरी गेले आजी पण आजारी असायची दोन मुलींची लग्न झाली होती पण माझी आई आणि मावशी नलू आणि मालू अशा खूप लहान होत्या नऊ वर्षाची माझी मावशी नलू आणि आई पाच वर्षाची तिचे नाव मालू होत आजीने भागीरथी ला पत्र टाकले तू महाराजांच्या परवानगीने येथे ये माझ्या मुलींना सांभाळण्यास माझ्या नंतर कोणी नाही तू येथे यावेस अशी माझी इच्छा आहे. यावर मावशीने खूप विचार केला महाराजांनी तिला दृष्टांत देऊन सांगितले की तू जा तुझी तेथे गरज आहे आणि मावशी अमरावतीत दाखल झाली आजीने मावशीच्या ताब्यात आपल्या दोन्ही मुली देऊन शांतपणे जगाचा निरोप घेतला. स्वतःचे घर होते त्यात पुतणे आणि भाचे वेगवेगळे बिराडे करून राहत होते पिठाची गिरणी होती त्याच्या भाड्यावर या तिघी राहत होत्या जुने सोनं,चांदी विकून आजीने आपले आजारपण काढले होते मावशीने मात्र आल्या आल्या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला घराची कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली आणि घराची घडी नीट बसवली गिरणीचे भाडे नियमित सुरू झाले आजी तब्येतीने अशक्त आणि स्वभावाने मवाळ असल्याने सर्व नातेवाईकांनी तिचा गैरफायदा घेतला होता मावशी मात्र करारी आणि तिचा शब्द म्हणजे दगडावरची रेष असायची तिच्या साधनेचे तेज तिच्या बोलण्यात वागण्यात दिसून येईल समोरचा माणूस घाबरूनच असे. वागण्यात मात्र अतिशय दयाळू सर्वांबद्दल प्रेम असणारी सुगरण अशी मावशी म्हणजे माय मरो आणि मावशी जगो या म्हणीला अक्षरशः खरे ठरवणारी होती तिने माझ्या आईवर आणि नलू मावशी वर अत्यंत माया केली वाघिणीसारखी त्यांच्यासाठी ती उभी राहिली त्यांचा मायेने सांभाळ केला नलू मावशीला हुशार असल्याने शिष्यवृत्ती मिळायची तिला बीएपर्यंत शिकवले दोघींची लग्ने लावून दिली स्वतःसाठी मात्र अगदी निस्पृह होती एक भाकरी त्यातून चतकोर कुत्र्याला चतकोर गाईला आणि सकाळ संध्याकाळ चतकोर भाकरी आणि घासभर वरण-भात असा तिचा आहार होता जन्मभर पोत्यावर झोपली पायात कधी चपला घातल्या नाही मुलींना उत्तम उत्तम पदार्थ करून खाऊ घालायची त्यांना कशाचाही त्रास होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून त्यांना वाढविले हे पाहून आजूबाजूचे अचंबित होत त्यांना म्हणायची महाराजांचा आदेश आहे म्हणून मी संन्यासाश्रम सोडून यांच्यासाठी संसारात आले पण बाकी पूर्ण वेळ नाम स्मरण आणि जप ध्यान करत असे
आईच्या लग्नानंतर ती आमच्याकडे 8-10 वर्ष राहिली त्यामुळे मला तिचा सहवास मिळाला
आमची आजीच होती ती मला लहानपणी मेतकूट भात दही लोणचं असं घेऊन बगीच्यात बसून जेवू घालत असे माझ्या पायाला खूप भेगा पडत तर गाईच्या तुपाला 21 वेळा दोन त्याने रोज मालिश करत असे संध्याकाळी आम्हाला देवाजवळ बसवून शांत हो श्री गुरुदत्ता, जयकरुणा घन अशी भजने म्हणत असे मला आजही ती भजने पाठ आहेत माझ्या इकडच्या आजी आजोबा काका आत्या सर्व लोकांवर तिने माया केली सगळ्यांना आईच्या मायेने स्वयंपाक करून प्रेमाने जेवू झाले माझ्या वडिलांबद्दल तिला फार प्रेम होते त्यांचा उदार स्वभाव लोकांना मदत करण्याची वृत्ती याचे तिला फार कौतुक होते त्यांनी देखील तिला खूप माया आणि आदर दिला शेवट पर्यंत तिची सेवा केली तिची अनेक रूपे मी अनेक वर्ष आईकडून ऐकत आले आहे अशा अत्यंत भक्तिमान स्त्रीच्या हातून आमचेही संगोपन झाले हे मी माझे भाग्य समजते अशी जगावेगळी माझी आजी मला नेहमीच स्फूर्ती स्थान राहिलेली आहे मी दहा वर्षाची असताना ती गाणगापूरला महिन्याभरासाठी गेली होती तिने तेथेच देह ठेवला तिच्या गुरु बंधूंनी खूप प्रेमाने तिचा शेवटी सांभाळ केला आई दादा मावशी आणि तिच्या यजमान तिला शेवटचा निरोप देण्यास गाणगापूरला गेले होते अशा अलौकिक व्यक्तीमत्त्वाचा शेवट दत्त महाराजांच्या गाणगापुरातच झाला हे तिचे भाग्य होते. माझी आई जाण्यापूर्वी मी तिच्याकडून मावशीचा फोटो घेऊन आले होते माझ्या खालच्या खोलीत मी दोघींचाही फोटो लावला आहे माझ्या आयुष्यातील या दोघींचेही स्थान खूप महत्त्वाचे आहे आजही मी रोज रात्री दोन्ही फोटोंना नमस्कार करूनच झोपायला जाते त्यांची कृपा माझ्यावर कायम राहो हीच ईश्वराजवळ प्रार्थना आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा