सोनेरी आठवणी
सोनेरी आठवणी
असं म्हणतात वयाची साठी उलटली की भूतकाळातील घटना लख्खपणे आठवायला लागतात माझ्या बाबतीत हे खरेच घडलेले आहे इतकी वर्ष न आठवलेल्या गोष्टी मला काल घडल्याप्रमाणे स्पष्टपणे आठवायला लागल्यात मलाच त्याचे आश्चर्य वाटते किंवा मधली काही वर्ष आपण संसारात मुलांच्या शिक्षणात लग्नांमध्ये बिझी होतो त्यामुळे विचार करायला वेळच नसे हे कारण असू शकते. आता रिकाम पण आलेले आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी लग्न होऊन मी त्रिचीला गेले तेव्हा दक्षिणेकडील मोठमोठी मंदिरे पाहून अवाकच झाले होते . त्रीचीच्या आसपास बरीच प्रचंड मोठी आणि देखणी मंदिरे आहेत. माझी आई भावंडे, मोठे दीर जाऊ बाई यांना सगळ्यांना दाखवून झाली त्यांना देखील ती फार आवडली.
त्यावर तीस वर्षे उलटली आम्ही बडोदा नागपूर असे सर्व करून पुन्हा त्रिचित दाखल झालो यावेळेस नोकरी बदलली होती त्यामुळे मोठे घर ते पण गावात गाडी ड्रायव्हर अशी सर्व सोय होती.
माझ्याजवळ निवांत वेळ पण होता हे सकाळी आठला जाऊन संध्याकाळी घरी येत. आता जुन्या मैत्रिणी पैकी फक्त आम्रपाली तेथे होती ती पण 25 किलोमीटर वरील टाऊनशिप मध्ये राहत होती त्यामुळे आठ दहा दिवसातून एकदा भेट होई.
मी वेळ घालवण्यासाठी माझ्या आवडीचा छंद शिवणकाम आणि पेंटिंग करण्यास सुरुवात केली त्याचबरोबर या वेळेस आजूबाजूची सर्व मंदिरे शांतपणे पाहायची ठरवले.
त्रीचित रॉक फोर्ट टेम्पल फार प्रसिद्ध आहे मद्रास त्रिची यामध्ये जाणाऱ्या एका ट्रेनचे नाव देखील रॉकफोर्ट एक्सप्रेस आहे गावाच्या मध्यभागी मोठा लाल रंगाच्या पाषाणाचा डोंगर आहे त्याच्या माथ्यावर गणपतीचे सुंदर मंदिर आहे 250 पायऱ्या दगडात कोरून बनविण्यात आल्या आहेत मी लग्न झाल्यावर एकदा वर गेले होते सुंदर हवा येते. आजूबाजूची भाताची शेती पाण्याने भरलेले तलाव आणि या डोंगराभोवती वसलेली छोटी छोटी घरे वरून बघण्यात खूप सुंदर दिसतात वर शंकराचे आणि गणपतीचे सुंदर मंदिर आहे हे मंदिर गावाच्या मध्यभागी मुख्य बाजारपेठेत आहे खाली उतरल्यावर छोटे गणपती मंदिर आहे सुंदर मूर्ती आहे तेथे देखील भाविक खूप श्रद्धेने पूजा करतात देवळाच्या भोवताली विविध फुलांच्या फळांची दुकाने तेथील प्रसिद्ध खड्याचे दागिने देवांच्या मुर्त्या आणि सिल्कच्या वस्त्रांची दुकाने देखील आहे यावेळेस तेथे मी तीन वर्ष दर मंगळवारी या देवळात जात असे खूप प्रसन्न वाटत असे. टुरिस्ट लोकांचे हे खास आकर्षण आहे.
त्रिचीच्या पाच किलोमीटर अंतरावर श्रीरंगम या गावी रंगनाथ स्वामी म्हणजेच विष्णूचे प्रचंड मोठे आणि पुरातन असे देखणे मंदिर आहे हे अतिशय जागृत आणि प्रसिद्ध असे मंदिर आहे मंदिराच सुरुवातीला मोठे गोपूरम आहे त्यानंतर सहा सात तटबंदी आहेत आणि मग मोठ्या प्रवेशद्वारानंतर मुख्य मंदिरात प्रवेश करता येतो खूप मोठा असा सभामंडप आहे त्यात सुंदर कोरीव काम केलेल्या अनेक मूर्ती आहेत त्याचबरोबर यक्ष किन्नर यांच्या देखील मूर्ती आहेत उंचछत आहे तेथे सुंदर नक्षीकाम देवतांच्या मूर्ती अगदी ड्रॅगन्स सुद्धा दगडांमध्ये कोरीव काम करून बनवण्यात आले आहे शेकडो वर्षापासून या मूर्ती जशास तशाच आहेत त्यांच्या सौंदर्यात काहीही कमतरता आली नाही रेखीव मूर्ती काम आहे. त्या काळात इतक्या उंच छतापर्यंत आणि उंच गोपूरांवर केलेले शिल्प काम पाहून आपण थक्क होतो. बरेच अंतर चालल्यावर आपण मुख्य गाभाऱ्या पाशी येतो दक्षिणेकडच्या मंदिरांची एक खासियत आहे येथे विजेचे लाइट्स गाभाऱ्यात वापरत नाही फक्त दिवे आणि समया वापरले जातात येथे बारा तेरा फुटाची झोपलेल्या अवस्थेत असलेली शेषशाही विष्णूची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे तिला समयांच्या प्रकाशात पाहणे हा एक वेगळाच अनुभव आहे हिऱ्यांचे दागिने घालून निद्रिस्त अवस्थेत श्रीविष्णूंना पुजारी लोक आपल्याला समईच्या प्रकाशात अगदी पावलापर्यंत दाखवतात पायात देखील हिऱ्याची पैंजणे घातलेली आहे .
काळ्या पाषाणात बनवलेली ही मूर्ती अतिशय मनमोहक आहे. गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर बरीच छोटी छोटी मंदिरे आहेत विस्तीर्ण परिसर आहे दगडात बनवलेला हा मंदिर परिसर अतिशय थंड असतो बाहेर जरी सूर्यनारायण तापलेला असला तरी आत कमालीचा गारवा असतो तेथे मसालेभात तिखट पुरी, वडा आणि प्रसिद्ध बुंदीचे लाडू असा प्रसाद मिळतो तो बसून खाण्यात आपण सगळा थकवा विसरून जातो. येथे जगभरातून दर्शन घेण्यासाठी प्रवासी येतात फॉरेनर सुद्धा खूप चोखंदळपणे येथील प्रत्येक गोष्ट प्रत्येक शिल्प बघत असतात.
ह्या मंदिराच्या विरुद्ध बाजूला रस्त्याच्या पलीकडे त्रिवणकोइल या नावाचे जलतत्त्वातील एक शिवलिंग असलेले मंदिर आहे पाच पंचतत्वातील शिवमंदिरापैकी ते एक प्रसिद्ध मंदिर आहे येथे जाणे मला फार आवडायचे कारण येथे अजिबात गर्दी नसेल मी दुपारच्या वेळेला तेथे जात असे
माझा ड्रायव्हर मुस्लिम असल्याने तो मंदिरात येत नसे. मी एकटीच पाच मिनिटं चालत मंदिराच्या सभा मंडपात पोहोचत असे हे पण एक प्रचंड मोठे असे मंदिर होते तेथील सर्वच मंदिरे आकाराने फार मोठी आणि काळ्या दगडांनी बांधलेली आहेत सुरुवातीलाच सभा मंडपात एक हत्ती बांधलेला आहे त्याच्यासोबत माहुत बसलेला असे तेथून आत गेले की बरेच अंतर सोडून एक छोटा गाभारा आहे त्यात शिवलिंग आहे तेथील पुजारी आपल्याला समईच्या प्रकाशात मूर्तीचे दर्शन
घडवतात त्यासोबत हातातील बारीक काठीने शिवलिंगा खालील पाणी हलवून आपल्याला दाखवतात येथे बाराही महिने पाणी असते आजूबाजूला कुठेही पाण्याचा मागमूस नाही हे हा एक चमत्कारच आहे गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा करताना सोन्याच्या कळसाचे दर्शन एका विशिष्ट कोणातून होते. दर्शन घेतल्यावर मी बाहेरील सभा मंडपात तासभर तरी शांतपणे बसत असे मंदिरात आतील पुजाऱ्या शिवाय कोणी नसेल पण मला कधीही एकटेपणा किंवा भीती वाटली नाही दूरवर हत्ती झुलत असे कधी कधी मी मुलींशी किंवा मैत्रिणींशी फोनवर बोलत असे माझ्यासाठी तो एक सुंदर अनुभव होता
मी स्वतःला फार भाग्यवान मानते की देवाने मला असा निवांत अनुभव घेण्याचे भाग्य दिले जे मला पुढील आयुष्यात मिळणे अशक्यच होते.
अशी अनेक मंदिरे आम्ही तेथील तीन वर्षाच्या वास्तव्यात पाहिलीत काही अगदी खेडेगावात होती पण यांच्या ऑफिसमधून आम्हाला त्यांचे पत्ते मिळत ते मी माझ्या पुढील लेखात लिहीनच कारण हा लेख फार मोठा होईल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा